Maharashtra weather news : 

राज्याच्या हवामानाचा एकंदर अंदाज व्यक्त करताना हवामान विभागानं काही महत्त्वाच्या गोष्टी अधोरेखित केल्या आहेत. मान्सूनच्या धर्तीवर काही भागांना सतर्कही केलं आहे.  




 

Monsoon Updates : मागील आठवड्यापासून सुरु असणाऱ्या पावसानं महाराष्ट्राच्या बहुतांश भागातील आसमंत झाकोळला आहे. ज्यामुळं सूर्यनारायणाचं दर्शन क्वचितच होताना दिसतंय. त्यातही हा पाऊस सध्यातरी काढता पाय घेण्याच्या किंवा उसंत घेण्याच्या तयारीत नसल्यामुळं हा नवा आठवडाही पावसाळी असणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. 

हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील 5 दिवस पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. राज्याच्या बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात म्हणजेच 27 ते 30 तारखेदरम्यान कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो असा अंदाज आयएमडीनं वर्तवला असून, पुढील 24 तासांच विदर्भातही काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुण्यातही सध्या पावसासाठी अनुकूल परिस्थिती पाहायला मिळत असून, पुढील दोन दिवसांच्या कालावधीत इथं मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. दरम्यान, पावसाच्या या दिवसांमध्ये ट्रेकिंग आणि वळणाच्या घाटरस्त्यांवर जाऊन हा थरार अनुभवण्याचा अनेकांचाच अट्टहास असतो. पण, अशा सर्वच उत्साही पर्यटकांना प्रशासनानं सतर्क करत घाटमाथ्यावर जाणं टाळावं असं आवाहन केलं आहे. तर, तिथे कोकणातही धबधबे आणि जलस्त्रोतांवर जाणं टाळावं असं आवाहन यंत्रणा करताना दिसत आहेत. 

पावसाची दमदार हजेरी... 

मुंबई, उपनगरांसह सोमवारी पावसानं राज्याच्या अनेक भागांमध्ये दमदार हजेरी लावली. तिथं चंद्रपूर जिल्ह्यात सोमवारी सायंकाळपासून पावसाने जोर धरला. या पावसामुळे उन्हाच्या काहिलीनं हैराण नागरिकांना दिलासा मिळाला. तर, शेतीच्या कामांची लगबग वाढली.  कोकणातही असंच काहीसं चित्र पाहायला मिळत आहे. कोकण पट्ट्यातील सिंधुदुर्गात सोमवारी सायंकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. ऊन आणि पाऊस असं चित्र कणकवली तालुक्यात पाहायला मिळालं. 

हेसुद्धा पाहा :  कुसुम सोलर पंप योजना ऑनलाईन अर्ज 2023 | 



कुठे देण्यात आलाय ऑरेंज अलर्ट? 

नागपूर (RMC) च्या हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, नैऋत्य मान्सून संपूर्ण महाराष्ट्रासह विदर्भात सक्रियपणे पुढे सरकतोय. परिणामी गोंदिया जिल्ह्यात पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार असून, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू राहील. या धर्तीवर गोंदिया जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट अंतर्गत सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. 

देश पातळीवर हवमानाचा अंदाज घ्यायचा झाल्यास इथं चित्र विपरित असल्याचं पाहायला मिळत आहे. (Himachal Pradesh Uttarakhand) हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसानं जनजीवन विस्कळीत केलं असून, येथील पर्यटनावरही याचे थेट परिणाम दिसून येत आहेत. हिमाचलच्या कुल्लू येथे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर हवामान बदल आणि भूस्खलनामुळं परिणाम झाले असून, काही तासांसाठी हा मार्ग बंद करण्यात आला होता. ज्यानंतर त्याची एक मार्गिका प्रवासासाठी सुरु करण्यात आली. उत्तराखंडमध्येही पावसानं चिंता वाढवली असून, चारधाम यात्रा प्रभावित झाल्याचं कळत आहेत. सध्याच्या घडीला भाविकांना सुरक्षित ठिकाणी थांबण्याचं आवाहन स्थानिक यंत्रणा करताना दिसत आहेत.